Friday, May 20, 1988

एकदाच सांग ...

हे असं का रे ?

तुला माझे करताना
मी तुझी होताना
आपण एकमेकांचे
झालोच नाही
हे असं का रे ?

माझे, ते ना तुझे
तुझे,ते  ना माझे
असे काही नातेबंध
आपल्यात विणले गेले

माझ्या विना तू
तुझ्या विना मी
असे काही क्षण
येऊन गेले
हे असं का रे ?

तुझ्यासाठी मी
माझ्यासाठी तू
ही आपुलकी
वाढलीच नाही
हे असं का रे ?

मला मी, तुला तू
वाचवताना
आपलं स्वप्निल नातं
वाचलच नाही
हे असं का रे ?

तुझे तुला
माझे मला
वेगवेगळेच
उत्तर मिळतय
हे असं का रे ?

हे असं का रे ?
सांग ना
एकदाच
हे असं
का रे ?


Sunday, May 1, 1988

असं का केलत गांधीजी ?

आम्हाला हिरवे वैभव
दाखवताना
बियांची मशागत
आम्हाला शिकवलीच नाहीत
असं का केलत गांधीजी ?

तुमचे केशरी रक्त
सांडताना
त्याचा कित्ता
आम्हाला शिकवलाच नाहीत
असं का केलत गांधीजी ?

तुमच्या पांढया टोपीतले
चौथ्या मितीतून
दिसणारे सप्तरंग
तुम्ही दाखवलेच नाहीत
असं का केलत गांधीजी ?

तुमच्या फिरत्या
चरख्याच्या गतीतून
पळणारी कालगती 
तुम्ही दाखवलीच नाही
असं का केलत गांधीजी ?

पेरणी करतानाच
कुंपण घालण्याची
लेनिनची दक्षता
तुम्ही घेतली नाहीत
असं का केलत गांधीजी ?