Wednesday, October 12, 1988

त्रयस्थ


शब्दांपासून, अर्थांपासून दूर
अव्यक्त भावविश्वात .
आपले गुलाबी चित्र
आपण अगदी पूर्ण करत आणले...
पण कसा कोणजाणे
वास्तवाचा कुंचला,
व्यवहाराच्या रंगात बुडून
माझ्या हाती आला !
आपल्या निष्पाप, निर्मळ चित्रापाशी
माझा हात थांबला, थबकला .
तू मात्र ते चित्र अधिकच
गहरे रंगवत गेलीस !
आणि मी अधिकच परका होत गेलो
त्या चित्राशी... !
तुझ्या रंगांचे गहरेपण,
"त्या" चित्राचे निर्व्याज्यपण
अजूनही भावतं मला .
अजूनही त्यातली माझी वळणं
शोधत राहतो...
पण फक्त एक -
त्रयस्थ म्हणून ....!

१२.१०.१९८९

संवादीपण


शब्दांइतके दुसरे कोणी
शत्रू माझे झाले नव्हते.
हवे तेव्हा हवे तसे
ते कधी फुटलेच नव्हते,
गद्दार होण्याइतकेही कधी
ते आपलेसे झालेच नव्हते.
दर वेळी, नेहेमी, नेहमी
त्यांचे काम करावे
फक्त डोळ्यांनी, फक्त डोळ्यांनी !
हळूहळू मग, जमली दोस्ती
शब्दांनाच मग ओढ लागली
किती बोलू अन किती नको,
नजर ओलांडूनी पुढे धावले...
अन्
आली अशीही वेळ
निष्प्रभ बनले डोळे - शब्द
अन्
अधरांमधले
थरथरतेपण
पुरे निवाले
संवादीपण !

१२.१०.१९८९