Sunday, October 21, 1990

रे...

कैद करतोस माझे शब्द
तुझ्या स्पर्शाच्या वळणांनी
नि फुलवतोस अबोलीचं वन

माझ्याजवळचे सारे स्पर्शमणी
काबीज करून, हवे तसे झुलवून
माझ्या बंद पाकळ्या
पुरेपुर सुगंधीत करून,
कठीण करून टाकतोस;
सारं काही...

काठावर उभं राहणं
झोकून देणं,
वा वाहून जाणंही .....

Friday, May 11, 1990

निळी जखम

दारिद्र्य, दु:ख, दुस्वास,

एकटेपण,भुकेलेपण,

धर्माचा अपुरा आधार,

आसपासचं भुकेलेपण,

अन त्यातून स्विकारलेले

स्वत:चेच कुपोषण...

भावाच्या मृत्यूचे भूत,

जाळून टाकणारा उत्साह.

काय काय अन किती

अंधारे कोपरे बघत गेलास

अन तरी सगळ्यातून

प्रकाश, निळा प्रकाश

शोधत गेलास...


तोच झिरपला

बहुतेक सगळ्या चित्रांत

निळ्या जादूने करू पाहिलास

साऱ्या  दु:खांचा विनाश

जगातल्या अंधाराचा वेध घेत

त्यातही उजेडाचा शोध घेत

अंधाराचा काळेपणा

हकलवून लावत

आकाशाचा गडद निळा

पसरवू पहात राहिलास.


कधी गव्हाच्या पिवळ्या शेतावर

कधी सुर्यफुलांच्या पाकळ्यांसोबत

कधी चांदण्यांच्या गुढ सोबती बरोबर

कधी बदामाच्या शुभ्र फुलांमागे

कधी दगडी रस्त्यावरच्या

कॅफेवर ओणवत

कधी चर्चच्या मागे धीरगंभीरपणे

कधी पॉंपीच्या लालभडक

ताटव्याला वाकुल्या दाखवत...

अगदी कापलेल्या कानाच्या

भळभळत्या जखमेला सामावून

अंगाखांद्यावरही लेवलास

तो निळाईचा शेला!


कलेतून पाझरवू पाहिलास

सहसंवेदनांचा निळा झरा

पण नाहीच बदलू शकलास,

प्राक्तन - ना तुझं ना समाजाचं...

ते मात्र अगदी तुझ्या

बुटांसारखं...

रंगविहिन, विटलेलं,

नात्यांचे बंध तुटलेलं-

बुटांच्या नाड्यांसारखं विदिर्ण...

ना आकार राहिला,

ना रंग रूप

ना काही उपयोग, ना सौंदर्य

एक टळटळीत सत्य

तुटकं, तुझ्या कानासारखं.


ठसठसणारी जखम

अगदी मृत्यूनंतरही तळपती राहिली

तुझ्या स्टारी नाईट सारखी...

निशब्द, हळवी, आतून कुरतडत जाणारी,

आतल्या आत नवनवीन

दु:खांची वलयं निर्माण करणारी

एक जखम फक्त!

---


नेट वरून साभार