Thursday, August 12, 2010

श्रावणधारा

झुरुमुरु झुरुमुरु वर्षती; श्रावणधारा
ऊन कोवळे सोनेरी जणू; पिवळा पारा

हिरव्या हिरव्या वनराईतूनी; वाही वारा
शीळ वाजवी जणू; कान्हाचा पावा

थुईथुई थुईथुई मोर नाचती; सजवी राना
पक्षी गोड कुजन करिती; देती सूर त्यांना

झुळझुळ झरे वाहती; नेती जलधारा
झुरुमुरु झुरुमुरु वर्षती; श्रावणधारा

Sunday, August 8, 2010

आता नाहीच कशात राम

चकित झाला होतास तू
कधी नव्हे ते, "काही" मागीतले होते मी .
अगदी स्वयंवरापासून तोपर्यंत;
मी होतेच तृप्त.
अन त्या दिवशी मात्र
माझ्या डोळ्यातली इच्छा पाहून, समजून.
हरकून गेला होतास तू ;
अन मोहरले होते मी.
त्या कांचन मृगाचे निमित्त मात्र....
तू जाणले होतेस माझे डोहाळे.
अन धावला होतास
तू................
एरवी तुझ्यासारखा विचारी, समंजस, संयत;
ऋषींच्या यज्ञात त्रास देणार्‍या दानवांना
ओळखुन, पिटाळणारा तू;
मारिचाला ओळखू नाही शकलास !
कारण तुझ्या डोळ्यात होती स्वप्ने
माझ्या कुशीतल्या बाळाची.
अगदी तूच नाही लक्ष्मणानेही
ओळखली होती माझी जडावलेली पावले.
अन त्या दुष्ट रावणानेही
ओळखली होती माझी अवस्था.
म्हणूनच केली ना त्याने
माझी रवानगी अशोक वनात .
अन हे सगळे माहिती असूनही
तू त्या परिटाचे ऐकावेस बोलणं ?
करावास माझा त्याग ?
का ? का ? का?
हो झाली माझी चूक.
झाला मला मोह.
केला मी हट्ट.
कांचनमृगाचा.
पण त्या साठी
इतकी मोठी शिक्षा ?
निरोपही न घेता
धाडून दिलस रानात.
ज्या जानकीसाठी तू
उचललेस शिवधनुष्य.
तिलाच सोडून दिलस , एकटं
पेलायला, आईपणाचे शिवधनुष्य !
आताच तर नितांत,
सोबत हवी होती
भावी स्वप्न आताच तर
रंगवायची होती.
कोठे गेला तो माझा राम ?
कोठे हरवला माझा राम ?
कोठे शोधू तुला राम ?
आता नाहीच कशात राम............... !