Saturday, October 23, 2010

मरणाचा सोहळा

वहायचा अखेर होता
क्रूस एकट्यास
शोधले कशास खांदे
तिरडी बांधण्यास

दिली अनेक वचने
गेली वाहण्यात
केले कित्येक बहाणे
शब्दात जागण्यास

गेले आयुष्य सारे
आधार मागण्यात
बदलले हरेक नाते
अखेर तुटण्यात

लागला कशास रुमाल
आसवे पुसण्यास
बाकी न राहिला काही
आधार जगण्यास

आता झाली पुरी
कारणे मरण्यास
पाहतो आहे मीच माझ्या
मरण्याच्या सोहळ्यास

Tuesday, October 19, 2010

मैत्री कशी असावी ....

माझ्या सर्व मित्रमैत्रिणीना

मैत्री कशी असावी ....
पोळीहूनही लुसलुशीत ; जिभेला गोंजारणारी
दुधाहूनही स्निग्ध ; जिभेला मऊसूत करणारी
दह्याहूनही कवडी ; जिभेवर टिकून राहणारी
तुपाहूनही रवाळ ; जिभेवर रेंगाळत राहणारी
श्रीखंडाहूनही निघोट ; जिभेवर मुरत जाणारी
चिवड्याहूनही कुरकुरीत ; जिभेला सोकवायला लावणारी
चकलीहूनही खुसखुशीत ; जिभेला अतृप्त करणारी
पिठीसाखरेहूनही गोड ; जिभेवर विरघळत जाणारी
अन मधाहूनही घट्ट ; जिभभर पसरत जाणारी
मैत्री अशी हवी !

मैत्री कशी हवी ....
मोरासारखी नाचणारी ; निखळ आनंद देणारी
कोकीळेच्या स्वरात गाणारी ; सुखसंवाद करणारी
प्राजक्तासम नाजूक ; हळूवार सुगंधी पखरण
रातराणीसम गंधीत ; मस्त धुंद करणारी
प्रवाहासम वाहती ; हवी तिथे नेणारी
खडकाहूनी अचल ; खंबीर आधार देणारी
मेणाहूनी मऊ ; हवी तशी दबणारी
सोन्यासारखी झळाळणारी ; मैत्रीचा कस दाखवणारी
अन आरशासम पारदर्शी ; जणू तुमचीच प्रतिकृती
मैत्री अशी असावी !

मैत्री कशी असावी...
ढगांसारखी आपल्याच मस्तीत ; हवे तेथे भटकणारी
विजेसारखी लखलखून ; चकीत करून सोडणारी
पावसासारखी भिजवणारी ; प्रेमात चिंब करणारी
न दुभंगणार्‍या पाण्यासारखी ; सलग, सजग, निखळ वाहती
वार्‍यासारखी स्वच्छंद ; बंध मुक्त करणारी
उन्हासारखी चमचमणारी ; लख्ख लख्ख उजळवणारी
इंद्रधनुसारखी सप्तरंगी ; जीवनाला रंगवून जाणारी
सावलीसारखी शीतल ; जणू मायेची पाखर
धरतीसारखी सृजन ; एक एक बी फुलवणारी
मैत्री अशी असावी !