Friday, March 30, 2012

तू गेलास तेव्हा ...

वैशाखाआधीच
असा वणवा पेटला !

अनेकदा कळला,
अनेकदा नाही
पण भिडत राहिलास
प्रत्येक वेळेस,
आत अगदी आत
कोठेतरी...

'हृदया'च्या संगीतातून
पाझरला जेव्हा जेव्हा
शब्द शब्द तुझा;
आत आत
झरत राहिला
पाऊस,पाऊस नुसता...

माझ्याही मनातल्या,
मलाच न समजलेल्या
भावभावना
वाचत राहिले
कधी समजून
कधी न उमजून...

आता तर तूही गेलास,
आता येणारा वैशाख
कसा, कसा झेलू ?
अन आता तो पाऊसही
'निनादेल' की नाही
कोण जाणे ...

Saturday, March 3, 2012

स्वर्गलोकीची परी

जिथे फुलली रातराणी
धुंदावत तेथे जाई

जाईजुईचा वेल ही
अशी झुलते कमानी
फुले कुंद ठाई ठाई
झाड शुभ्र चांदण्यांनी

झुबे बुचाचे डोलती
वार्‍यासंगे वरखाली
नवे धुमारे फुटती
सुगंधी मधुमालती

टपोरी गुलाब कळी
शोभे बागेची राणी
छे स्वर्गलोकीची परी
येई माझिया अंगणी