Monday, May 19, 2014

शुभंकर

एकदा स्विकारलास ना

नदीचा जन्म

उतरलीस डोंगरमाथ्यावरून खाली,

खळाळत धावलीस कड्या, दरीतून 


कितेक झाडांना, शेतांना, गावांना,

पशुपक्षांना, माणसालाही

देत राहिलीस जीवन 


आणि प्रसंगी त्यांची पापं, लक्तरं, घाण

सगळं पोटात घेऊन

राहिलीस न धावत? 


धावत राहिलीस दगडगोट्यातून

कधी जरा विसावलीस घाटावर,

कधी जरा उधळ भूमीवर

पण तरीही पुढे सरकलीसच


ही कसली ओढ होती तुला?

कसले आकर्षण, कसला मोह

कसली घाई, कसला सोस

जन्मापासून धमन्यात तुझ्या

जोपासलास हा कसला वसा 


ना कसली तमा, ना कसली काळजी

ना कोणती माया, ना कोणता पाश

सोबत येईल त्याला घेऊन

धावत राहिलीस सदासर्वकाळ 


जो न आला सोबत

सहज सोडलास हक्क

ज्याच्या त्याच्या निर्णयाचा

राखलास यथायोग्य मान

पण तुकवली नाहीस कधीच मान 


कोणाचे शाप, कोणाचे नमस्कार

कोणाचं अर्ध्य, कोणाचे पीतर

कोणीचे दु:ख, कोणाचे जीवन...

सगळे सगळे स्विकारत

तू पुढे पुढेच, अविरत, चिरंतन 


अन आज, अन आज 

तू उभी, काहीशी पलटून

काहीशी थबकून

एक पाय पुढे, एक मागे 


कधी मागे न बघणारी तू

आज थबकून 

मागे पाहू बघतेयस

कसला संकोच, कसली भिती

कसली हुरहूर, कसले काहूर 


तू तीच

ओहोळ, ओढा, नदी, महानदी

तू तीच 

फक्त रूप बदलले

वाहण्याचे तर हेच श्रेयस

प्रवाहापरि रूप प्रेयस


हो पुढे तू आजही बिनदिक्कत

नदी ना तू , मग कशास हरकत

नाव बदलेल, रुप बदलेल

तरीही मर्म तेच असेल

चल हो पुढे तू, तू तर शुभंकर

नदी नव्हे तू; हो रत्नाकर!

Wednesday, May 7, 2014

आरसे


प्रेम म्हणजे नक्की काय असतं
न भांडता, प्रेमळपणे
एकाने दुस-याची मूळ मते, स्वभाव
बदलून टाकणे
की
वेळप्रसंगी भांडून तंडून
दुस-याला त्याच्या मता-स्वभावा प्रमाणे
वागू देणं

प्रेम म्हणजे नक्की काय असतं
प्रेमळपणे आपल्याला हवे तेच
दुस-याला देणे
कि
वाद घालूनही, शेवटी
दुस-याच्या गरजा अन अपेक्षांनुसार
त्याला हवे ते देणे

प्रेम म्हणजे नक्की काय असतं
प्रेमळपणे दुस-यावर हक्क दाखवत
आपली हुकमत गाजवणे
कि
वेळप्रसंगी पुढे ढकलून
दुस-याला त्याची वाट
चालायला लावणे

प्रेम म्हणजे नक्की काय असतं
प्रेमळपणे एकमेकांचे पाय
एकमेकांत गुंतवून ठेवणे
कि
समजून उमजून, स्वेच्छेने
दोन वेगळ्या वाटा
सोबतीने चालणे

प्रेम म्हणजे नक्की काय असतं
लोकांना दाखवण्याचे
सुखी संसाराचे
शो पीस असावेत
कि

एकमेकांना दिसणारे
सुखी जीवनाचे
असावेत आरसे