Saturday, May 9, 2015

छाया शिल्प

(जपान मधे एका म्युझियम मधे एक दगडी पायरी जपून ठेवलीय. ज्यावर माणसाची आकृती कोरली गेलीय.  हिरोशिमाचा अणुबाँब पडला तेव्हा तो माणूस त्या  उष्णतेत क्षणात जळून गेला. दगडी पायरीही जळली पण त्या माणसाचीची सावली पडलेली  तिथली जागा कमी जळली , कारण त्या क्षणभरात तिथे  माणसाची सावली पडली होती. अन तितका भाग  वाचला. माणूस विरघळून गेला उरली फक्त सावली...)


(  छायाचित्र आंतराजालावरून साभार  )



मी उभा त्या पायरीपाशी
चालत होतो वाट जराशी
समोर होते कार्यालय अन
उतरलो, बस थांब्यापाशी

धावधाऊनी वेळ पाळण्या
बॅग घेऊनी उरापाशी
फक्त होता मधे एक तो
रस्ता, ओलांडून जाण्यासाठी

तिथेच उभा मी पायरीपाशी
वाट पाहत सिग्नलपाशी
तेव्हढ्यातच पण पाही वरती
शतसूर्यांचा लखलखाट गगनी

कल्लोळ उठे ठाई ठाई
लाही लाही साऱ्या शरिरी
जाणीव कुठली, आत नुरली
कोरीव छाया, मागे उरली

बंदिस्त  कधीचा पायरीतच मी
मी न, कोरीव छाया नुसती...
उभा कधीचा त्या पायरीपाशी
दिक्कालाचे छाया शिल्प उरी