Friday, August 14, 2015

राधे राधे, जपून ठेव ग

बाऊल लोकगीत गाणाऱ्या पार्वती बाऊल यांच्या एका बंगाली गीतावर आधारित माझी कविता

राधे राधे, जपून ठेव ग, मधुसुदनाची प्रेम कहाणी

पळ पळ राहु दे ऱ्हदयी, 
गाभाऱ्यात आरसपानी,
तसेच राहो शाम आस ही; 
अस्पर्श, अशब्द, अविनाशी
राधे राधे, जपून ठेव ग, मधुसुदनाची प्रेम कहाणी

गुपीत मनातच राहू देई, 
बोलू नको शब्द काही
न कोणा ओळखू येई, 
न कोणा समजेल काही
राधे राधे, जपून ठेव ग मधुसुदनाची प्रेम कहाणी

विरह शाम सख्याचा देईल, 
दु:ख  तुजला गे राणी
त्या त्या वेळी बघ आभाळी, 
गडदमेघ तू निरखत राही
राधे राधे, जपून ठेव ग, मधुसुदनाची प्रेम कहाणी

उकिडवे रांधता काही; 
डोळा येता खळ्ळकन पाणी
ढकल सखे ग ओले लाकूड; 
धूर तयाचा सारे लपवी
राधे राधे, जपून ठेव ग, मधुसुदनाची प्रेम कहाणी

शाम रंगी रंगून जाता, जपून ठेव तुझे ते वसन रेशमी
भवचक्राच्यातून फिरताफिरता; वसनाची का चिंता करिशी
राधे राधे, जपून ठेव ग, मधुसुदनाची प्रेम कहाणी
                                       

Thursday, August 6, 2015

... अवकाश आदी

संपली, शांतावली, ती ज्योत सायंकाळची
पेटली ऱ्हदयात आग, आकांक्षांची ही नवी

झाले जगुनि सारे म्हणता, वाट सरली आरधी
बाण चढे आयुष्याचा पण नियतीच झाली पारधी

तो कसाच, तसाच उभा; पण वाट कधीचीच सरली
शोधणे, शिकणे, समजणे; राहिले सारे परि उरी

संपली ना आस काही, न संपली उभारी मनीची
झगडतो, झगडेन आणि, रात्र कुठे संपली अजुनि

मी न संपेन कधीही, जोवर आशा फुलते जगी
येऊ दे काळरात्र, अथवा होऊ दे अंध:कारही

मी अनादी, मी अनंत, मीच अंत अन मीच आदि
क्षण, काळ, पळ, वेळ, निमिष, अवकाश आदी