Tuesday, January 24, 2017

सागरओढ ( अनुवाद)

Sea Fever : BY JOHN MASEFIELD या कवितेचा स्वैर अनुवाद

सागरओढ

आज गेलंच पाहिजे, खोल खोल एकांत समुद्रात आभाळासोबत,
संगतीला हवीय उंच शिडाची होडी अन तिलाच न्याहाळणारा एक तारा;
सुकाणूचा ताबा अन वाऱ्याच्या शिळेवर फडफडणारे शुभ्र पांढरे शीड,
सागरावरच्या गुढ गडद धुक्याला कापत जाणारा संधीप्रकाश.

मला पुन्हा जायलाच हवं, समुद्रात खोल खोल, बोलावतेय प्रत्येक लाट
वाऱ्याचा तो पुकारा, अगदी आतून आलेला पुकारा, नाहीच टाळता येणार आता;
शुभ्र नभांनी गच्च भरलेला वादळी दिवस हवाय फक्त,
फेसाळलेल्या फुटणाऱ्या लाटांचे तुषार, सीगलचा आर्त पुकारा.

मला गेलच पाहिजे समुद्रात खोल खोल, त्या वेड्या दर्यावर्दीसारखं,
उजेडाच्या तिरिपीसारख्या त्या,  गील आणि व्हेलच्या वाटेवरून;
आठवणींच्या लडीतून घुसत, हास्याच्या धबधब्यातून वाट काढत,
आणि शांत, सुमधुर स्वप्नात हरवून जायचय, ती गुढ गप संपायच्या आत.

Thursday, January 12, 2017

आणि म्हणे...



कबूल करणंही कोणाला अस्वस्थ करू शकतं;
हे कधी डोक्यातच आलं नाही.
इतका सरळ, साधा माफीचा मुद्दा;
कधी अडचणीचा ठरू शकतो, कोणाला.
नको ते जोडले जाणारे संबंध
आणि त्या सोबत येणारे मानपान...

जगणं साधं सरळ सोपं का असू नये
कंगोऱ्यांची किनार अन् गालबोटाचा ठिपका
अगदी हवाच का तलम मऊ वसनाला
सळसळ सुटत जाणारं अलवार पोत
हलकेच मनाला स्पर्शून जाणारं निरागस
सगळच कसं झाकोळून झाकोळून...

एक छोटासा हो - नाहीचा गुंता
अन त्यावर डळमळणारा डोलारा
खळ्ळकन फुटून पडलेलं
निर्वाज्य भावभावनांचं जग
अशक्य,अस्वस्थ तळमळ
अन उरलेली निर्विकार पोकळी...

आणि म्हणे जग न
आनंदाने.....