Saturday, September 8, 2018

विसरलास तू सारे काही...


विसरलास तू मंजूळ पावा
विसरलास अन यमुनेचा तीर
विसरलास तू राधा वेडी
गोप गोपी अन दहीदूधलोणी
ब्रजभाषेतील अविट गोडी
अनवट वेणुची धुंद लकेरी
घट्ट मिठी, मैय्येची ती
अन नजर पारखी नंदाची
विसरलास बघ तू सारे काही

घुमतो शंख कधीचा आता
रण धुमांकळी गजबज सारा
भरून राहिला गाज गीतेचा
आप्तेष्टांचा खच पसरला
कळिकाळ बरसला घराघरा
कुठे विसरलास ती मधुरवेळा
कुठे विसरलास ती आर्त आर्तता
कुठे तो झुळझुळ यमुना तीर
अन कुठे लाटांवर आरुढ सागर
कुठे हरवली ती कृष्ण प्रिती
अन् उभी ठाकली कृष्णनिती

Tuesday, September 4, 2018

तान्हा कान्हा


पुरा उभा वठलेला मी
तरीही प्रसवतो काही
दिसतो काष्टवत वरुनी 
तरी रुजते आत काही

भिजलो जलधारेत किती
उनकवडसे ल्याले किती
मोजदाद न केली कधी
जीवनगाणे गात मनी

संथ धडधड उरातली ती
कुठे लोपली होती न कळे
दिड्दा दिड्दा सतारीतला
आज न कळे कसा उमटला

फुटला पान्हा वांझ नराला
भळभळ वाही जीवनवेळा
कळीकाळाचा सुटला वेढा
नरे प्रसवला तान्हा कान्हा

Wednesday, August 22, 2018

ओल

कोणता भूतकाळ आठवून 

कोसळत असेल हा पाऊस


अखंड पाझरणाऱ्या धारा

शोधत असतील तृषार्त भिंती


कोणती फट खुलं करत असेल

अंतरंग भितीचं, त्या धारांना


झिरपणारी ओल भिंतीतली

कुठकुठले आठव झरत असेल


कुठून पाझरत असतील

कोणत्या जुन्या संस्कृतीचे झरे



Monday, July 30, 2018

सख्या...

माझं तुझ्याशी असलेलं
नातं, काळानुरुप किती 
बदलत गेलं 
तू मात्र नेहमीच
राहिलास तसाच
अविनाशी, चिरंतन

त्या दाहक सुर्यासमोर
उभा राहिलास तरल,
हलका, मंदसा
कधी प्रथमा, द्वितिया,
तृतीयेला गोड नाजूक
हसत आलास

कधी गायब होऊनही
स्वत: च ठळक अस्तित्व
ठसवत आलास
कधी पूर्ण होऊन
गाढ कवेत घेतलस  
पूर्ण आश्वासक होऊन

लहान असताना होतास
गोरा गोरा मामा
दूरस्थ सहृदय.
मोठेपणी झालास मित्र
रात्री अभ्यासात झालास
मार्गदर्शक दोस्त

तारुण्यात बदललच सगळं
धुंद रात्रींनी फुलवलं
तुझ्यातलं सौंदर्य
अन नकळताच मानलं
तूच माझा सच्चा,
स्वप्निल प्रियकर

अजून मोठं होताना
बदललं पुन्हा नातं
झालास मेघदूत
त्याचा आठव शोधताना
तुझ्यात शोधत राहिले
त्याचा मुखचंद्रमा

मग कधीतरी एकटीच
रात्री थोपटताना होता
तुझा गारवा
बाळाशी गुज करताना
आलास तू भरवायला
बनून चंदामामा

मग काही रात्री
गेल्या शांत निवांत
आश्वासक गाढ
माहित होतंच तू
आहेस तिथेच तिथेच
निरंतन, अविनाशी

अन मग पुन्हा
सुरु झाला मायलेकांचा
पाठशिवणीचा खेळ
पुन्हा पाठवले निरोप
तुझ्याच संगे त्याला
नीट रहा हं

पण मन अशांतच
धडधड धकधक चालू
अस्वस्थ हुरहूर 
अन मग तिकडेही
तू दिसलास एकदम
मोठा, जवळ

एकदम हुश्यच झालं
आहेसकी तू इथेही
लक्ष ठेऊन.
आम्ही नसलो तरी
पाठिशी आहेस तू
त्याच्या सदैव

अन परवा तर
गंमतच झाली बघ
त्याचा निरोप
आई तुझ्या चंद्राला 
बजावून आलो आता, 
लक्ष ठेव रे

बघ आम्ही तुझ्याशी
नातं कसं बनवलय
चिरंतन पण बदलणारं
अन सख्या, तूही नेहमी
राहिलास तसाच
अविनाशी, चिरंतन

Saturday, July 28, 2018

चांदवा

दिवसेंदिवस, वर्षे
इतके दाह सोसून
कित्येक रात्री उसवल्या
तुझ्या सोबतीने

इतक्या की हळूहळू
तुझ्याही न कळत
तूच झिरपत गेलास
अलवार माझ्यामधे

चांद मातला मातला
ऐकलेलं कित्येकदा
बघितलं, अनुभवलंही
कधी कधी आतून

पण आतमधे झिरपलेला
आणि शांत करत गेलेला
ऐकला नाही कधीच
फक्त अनुभवला, एकलीनेच

Wednesday, July 18, 2018

निवडुंग


रखरखीत रेताडावर, 
फक्त खडकाचाच आधार

ना आसमंतात सावली, 
वर शुष्क उष्ण बोचरावारा

बेरंगी, शुष्क आसमंत; 
नीरव, निर्विकार शांतता

पक्षी, प्राणी, मानव; 
कोण्णा कोणाचाच ना संग

ना आभाळाची माया,
ना कोणता जीवन-स्त्रोत

सृजनाची कोणतीच, 
अगदी नसलेली लक्षणं

आणि तरीही, अगदी 
आतून उमलून आलेली

ही फुलांसारखी नाजूक, 
हिरवी, लाल जीवनेच्छा

शिकवतेय दगडालाही; 
बघ, बघ, असं जगायचं!

Thursday, January 25, 2018

असं करुयात?


प्रत्येक क्लासिक गोष्ट
दु:खांताचीच का असते
की दु:खांतामुळेच
ती होते क्लासिक?

चला, जरा प्रयोग म्हणून
लैलामजनुचा संसार थाटूत;
जऽरा शुकुंतलेची अंगठी
तिच्या बोटात घट्ट बसवूत.

जमलच तर शिरिफरहानला
बांधू एका गोड धाग्यात,अन
ऑथेल्लो ला शिकवून टाकुत
जगायचं कसं प्रश्नांशिवाय!

पण मग सुटतील का
सगळे प्रश्न, सगळे गुंते;
की नवीनच सुखद प्रश्न
उभे रहातील, आ वासून?

अन मग सुखातांचे,
हे कसले कसले प्रश्न घेऊन
कसं काय चालायची
आपली सामान्य वाट?

कि बरे आपले दु:खान्तच.
कला प्रसवायला तेच बरे
रोजची दु:खं साहणं तरी
जऽऽरा सोपी होतील?